Wednesday, 26 March 2014

मातृत्व- एक अद्भुत अनुभूती

मातृत्व- एक अद्भुत अनुभूती:
येणाऱ्या बाळाची चाहूल लागताच सगळं जग कसं सुंदर वाटू लागतं.. आपल्या शरीरात आणखीन एक जिवंत शरीर वाढतंय ह्याची अनुभूती फक्त ती आईच घेऊ शकते जी एका बाळाला जन्म देते.
त्या जीवाची वाढ होणे, त्याचे सर्व अवयव व्यवस्थित विकसित होणे, इतकेच नवे तर त्याला बुद्धी, शक्ती, प्रज्ञा, तेज, वाचा, मन आणि सुदृढ काया प्राप्त होणे हा केवळ एक दैवी चमत्कारच आहे. नीट विचार केला तर केवळ ९ महिन्यांमध्ये परमेश्वर आपल्याला आपल्यासारखाच आणि आपलाच एक अंश असलेला मानव प्राप्त करून आपल्याला जणू एक अमुल्य भेटच देतो. हि कदाचित अशी एकमेव गोष्ट असेल जी शास्त्रज्ञ किंवा जगातला सर्वात बुद्धिमान मानव किंवा यंत्र कधीच निर्माण करू शकत नाही. देवाचे अस्तित्व न मानणारे ह्या क्रियेला फक्त 'निसर्ग' म्हणून संबोधत असतील इतकंच!
त्या जीवाची दिवसागणिक वाढ बघितली तर आपल्या लक्षात येईल कि हा चमत्कार केवळ परमेश्वरच करू शकतो.. केवळ अवयव प्रदान करणे इतकेच हे कार्य नसून कितीतरी सूक्ष्म बाबींचा विचार त्याला करावा लागतो..
डोळ्यांना दृष्टी, रंग ज्ञान, अंतर समजण्याची क्षमता प्राप्त करून देणे, जिभेला चव घेण्याची, बोलण्याची क्षमता असणे, हाता-पायांना शक्ती, योग्य हालचाल असणे, मेंदूमध्ये बुद्धी आणि स्मरणशक्ती असणे, नाकामध्ये श्वसन आणि वास घेण्याची क्षमता असणे, आणि हृदयामधली 'धडधड' अविरत चालू ठेवणे.. हे सर्व केवळ आणि केवळ परमेश्वरी चमत्कार आणि त्याची कृपाच आहेत! पण तोच श्वास जेंव्हा त्याला थांबवायचा असतो, तेंव्हा तज्ञ डॉक्टर्स सुद्धा काही करू शकत नाहीत.
हा सर्व विचार केला तर केवळ ९ महिन्यांमध्ये एक जिवंत मानवी शरीर निर्माण करणे ही मानवाला मिळालेली एक परमेश्वरी देणगीच आहे ह्यावर ठाम विश्वास बसतो!
'आई' अशी हाक मारणारं आपलं स्वतःचं एक बाळ असावं, अशी प्रत्येक स्त्री ची आकांक्षा असतेच.; आणि खरंतर स्त्री ला मातृत्वा नंतरच एकप्रकारचे समाधान आणि शांतता प्राप्त होते असे म्हणतात.प्रसुति कशीही झालेली असो, आपल्या बाळाच्या चिमुकल्या हातांच्या स्पर्शाने, त्याच्या त्या निरागस चेहेऱ्याकडे, इवल्याश्या पावलांकडे पाहूनच ती आई सर्व प्रसूती वेदना विसरून जाते. . तिला पान्हा फुटतो.
लहान मुलं परमेश्वराचा अंश असतात ह्यात काही शंका नाही.. त्यांचं वाढणं, हळूहळू रांगायला, चालायला, बोलायला शिकणं हे बघताना प्रत्येक आई ला मातृत्वाचा अभिमानंच वाटतो. आणि तेंव्हा प्रत्येक आई ला आपलं बाळ लहानच राहावं असाही वाटतं..
ज्यांना परमेश्वर कृपेने हे भाग्य लाभलं, त्यांनी आपापली संस्कृती जपून त्यांच्या मुलांवर उत्तम संस्कार करून पालकत्वाचे कर्तव्य पार पाडावे आणि पालकत्वाची संधी दिल्याबद्दल परमेश्वराचे आभार मानावेत. ज्यांना दुर्भाग्याने/ दुर्दैवाने हे सुख प्राप्त झाले नाही त्यांनी अनाथ मुल दत्तक घेऊन समाजाचे ऋण फेडावेत आणि पालकत्वाचा आनंद उपभोगावा.
कारण शेवटी जन्म पेक्षाही जास्त महत्व कशाला असेल तर संस्कारांनाच!