प्रत्येकाची कुटुंबे वेगळी असतात.. कोणा आई वडिलांना फक्त मुलेच असतात, कोणाला फक्त मुलीच असतात.. तर कोणाकोणाला मुलगा आणि मुलगी दोनही! मला वाटतं, मुलगा आणि मुलगी दोनही असणारे समतोल विचार करू शकतात. आणि करत नसतील तर त्यांनी तो करावाच!
बऱ्याचदा आपल्यासारख्या कुटुंबांमध्ये जिथे मुलगा आणि मुलगी दोनही असतात, तिथे मुलीचे आधी लग्न लावले जाते किंवा जात असे.. आई वडील म्हणतात, एकदा का हिचे लग्न लाऊन दिले की माझी जबाबदारी संपली. पण वास्तविक जीवनात, बरेच आई-वडील लग्नानंतरही मुलीच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करताना किंवा क्षुल्लक गोष्टींची विनाकारण काळजी करताना दिसतात. बऱ्याचश्या मुलीही आपल्या घरातल्या वैयक्तिक गोष्टी उटसूट आपल्या माहेरी सांगत बसतात. मुलगी लग्न होऊन तिच्या सासरी गेली, स्थिर झाली की खरंतर आई-वडिलांची काळजी मिटते पण काहींची ती विनाकारण वाढते.. त्या काळजीत, काहींना हे लक्षातही येत नाही की त्यांचे चिरंजीवही मोठे झाले आहेत, पण त्यांच्या आपणहून लक्षात जरी नाही आले, तरी जेंव्हा घरात त्याच्या एखाद्या खास मैत्रिणीची वर्दळ वाढते तेंव्हा मात्र त्यांना ते समजून घ्यावेच लागते आणि त्याच्याही लग्नाचा लवकरच बार उडतो.
झाले, घरामध्ये 'सुनबाई' आल्या.. ह्या क्षणी बऱ्याच सासवा हे विसरतात कि
आपणही असेच एकदा ह्या अनोळखी घरात आलो होतो आणि इतके वर्ष ह्या घरामध्ये
जरी आपले वर्चस्व असले तरी आता आपण ते हळूहळू तिला सोपवायला पहिजे.. आपला
संसार झाला; आता आपण निवृत्त झाले पाहिजे.. बऱ्याचदा ह्याच्या उलट होते!
सून घरात आली म्हणल्यावर सासूला उगाचच असुरक्षित वाटू लागते.. आणि ती
पहिल्यापेक्षा जरा जास्तच जोमाने काम करू लागते.. सुरुवातीला जरी सगळे
सुरळीत वाटले तरी बऱ्याचदा सासवा उगाचच मुलगी आणि सून ह्यांच्यात तुलना करू
लागतात. तेंव्हा त्यांच्या हे लक्षात येणे गरजेचे असते की मुलगी आणि सून
म्हणून नव्हे तर दोन भिन्न व्यक्ती म्हणून त्यांच्या सवई, संस्कार, स्वभाव,
आवडी-निवडी, त्यांच्यातले कलागुण, शिक्षण, सौंदर्य, शरीरयष्टी, त्यांची
ध्येयं, त्यांचे विचार आणि त्यांचे वैयक्तिक जीवनातील अनुभव हे वेगळेच
असणार. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे कोणीच कोणाची कोणाशी तुलना करू नये. जी
गोष्ट आपल्या स्वतः ला आपल्या बाबतीत झालेली आवडणार नाही ती आपण
दुसऱ्याच्या बाबतीतही कधी करू नये.
प्रत्येक नात्यात संवाद आणि सुसंवाद खूप महत्वाचा असतो. एकमेकांना वेळ
देणे, समजून घेणे हे दोनही बाजूंनी झाले पाहिजे नाहीतर नात्यातला ओलावा
टिकणार नाही. प्रत्येक व्यक्तीला तिने केलेल्या चांगल्या कामाबद्दल कोणीतरी
२ शब्द कौतुक करावे असे वाटते. "व्वा, फारच छान!" असे शब्द ऐकून त्या
व्यक्तीला आणखी प्रेरणा मिळते पण त्या उलट जर घरातलेच कौतुक करण्यात कमी
पडले तर त्या घराला कधीच घरपण येणार नाही. उदाहरणार्थ,
सासू-सुनांपैकी कोणी छान भाजी केली तर लगेच "व्वा, छान झालीये हं भाजी"
म्हणल्याने करणाऱ्याला बरे वाटते आणि आपल्या कष्टांचे चीज झाले असे
वाटते.. किंवा सूनबाईन्नी कधी दारात छानशी रांगोळी काढली तर "छान आलीये हं
रांगोळी" हे चार शब्द बोलायला दोन सेकंद पण लागत नाहीत पण तेच नाही म्हणले
गेले तर कदाचित तिच्या मनात कायमस्वरूपी आढी निर्माण होऊ शकते. तिच्या
कोणत्याच चांगल्या गोष्टींचे घरात कौतुकच होत नाही असे तिला वाटू शकते.
तिच्याच जागी जर आपल्या मुलीने एखादे चित्र, काहीतरी कलात्मक गोष्ट
किंवा तीच रांगोळी काढली असती तर आपण कौतुकाने आणखीन चार लोकांना
सांगितलेही असते, मग तीच गोष्ट सहजरीत्या तिच्याही बाबतीत व्हायला हवी.
कौतुकाचे दोन शब्द, वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा, एखाद्या कर्तृत्वा बद्दल,
शैक्षणिक किंवा व्यावसायिक यशाबद्दल देण्यात येणारी छोटीशी भेट आणि
शुभेच्छा, ह्या छोट्या दिसणाऱ्या गोष्टी खूप मोठे काम करून जातात.. आपण हे
करत आहोत नं हे प्रत्येक कुटुंबीयाने पहिले पहिजे.
परवाच मी एका मराठी मालिकेमध्ये ऐकले, 'सून कधी मुलगी होऊ शकत नाही आणि
सासू कधी आई होऊ शकत नाही'. हे खरे का खोटे मी सांगू शकत नाही पण सुनेनी
सासूशी 'सासू' म्हणून आणि सासूने सुनेशी 'सून' म्हणून वागण्यापेक्षा एक
माणूस म्हणून वागले तरी गोष्टी खूप सोप्या होतील..
येणारी नवीन मुलगी नवीन अनुभव घेऊन येते, तेंव्हा एखादी गोष्ट आम्ही 'अशीच'
करतो हा ठेका चालवण्यापेक्षा नाविन्य स्वीकारायला काय हरकत आहे? "Change
is the constant thing in the world"- बदल हीच कायमस्वरूपी राहणारी गोष्ट
आहे त्यामुळे तो स्वीकारणेच सर्वांच्या हिताचे असते. कारण आज ना उद्या,
तुमची इच्छा असो वा नसो तुमचे कुटुंब पुढे तीच चालवणार आहे!
येणाऱ्या सुनेलाही काही गोष्टींची जाणीव व्हायला वेळ लागू शकतो.. प्रत्येक गोष्टीला, नात्याला स्थिर व्हायला एक वेळ द्यावा लागतो.. जसे
नवरा-बायको लग्नाच्या आधी एकमेकांच्या अपेक्षा discuss करतात तसंच
लग्नानंतर घरातल्या सर्वांनीच एखाद्या सुट्टीच्या दिवशी अशी चर्चा करायला
काय हरकत आहे? काहींना बोलल्याशिवाय काही गोष्टी कळत नसतील, तर संवादासारखे
माध्यम नाही. पण त्यात कुठेही एकमेकांची उणी-दुणी न काढता आपले मत व्यक्त
करणे एवढाच उद्देश असू द्यावा, बळजबरी नको. आपल्या मते एखादा चुकतोय ह्याचा
अर्थ तो चुकीचाच आहे हे ठरवायचा हक्क आपल्याला नाही. आपण गोड भाषेत
सुचविण्याचे काम करू शकतो त्याउपर प्रत्येकालाच व्यक्ती-स्वातंत्र्य आहे
ह्याची जाणीव ठेवावी.
Generation gap हाही भाग खूप महत्वाचा आहे आणि तो राहणारच. मतभिन्नता ही वडील-मुलगा, आई-मुलगी ह्यांच्यातही असू शकते तर सासू-सुनांमध्ये का नाही असू शकत. लग्नापर्यंत कितीही मतभिन्नता असेल तरीही जसे आपण आई-वडिलांपासून वेगळे होत नाही तसे बायको आल्यानंतर त्यांचे एकमेकांशी पटत नाही म्हणून 'वेगळे होणे' हा पर्यायाच असू शकत नाही. केवळ आणि केवळ संवाद हाच ह्यावरचा उपाय आहे. आजकाल एकत्र कुटुंबे राहिलीच किती आहेत? पण ज्यांची आहेत त्यांनी तरी ती खरोखरच एकत्र कशी राहतील ह्यावर भर द्यावा.